करमाळा (अशोक मुरूमकर) : भीमा नदीवरील उजनी धरणातून इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडणाऱ्या बहुचर्चित शिरसोडी ते कुगाव पुलाचे भूमीपूजन करण्याचा मुहूर्त ठरला आहे. शुक्रवारी (ता. २३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिरसोडी येथे या पुलाचे भूमीपूजन केले जाणार आहे. अनेक दिवसांपासून या पुलाचे काम करण्याची मागणी नागरिकांची होती.
भीमा नदीवर उजनी धरण झाल्यापासून बॅकवॊटर भागात इंदापूर ते करमाळ्याला जाणाऱ्या नागरीकांची गैरसोय झाली होती. या भागातील नागरिकांना जवळचा मार्ग म्हणून बेकायदा बोटीने प्रवास करावा लागत होता. त्यातूनच दुर्दैवी घटनाही घडल्या. त्यात काहींचे जीवही गेले होते. तीन महिन्यापूर्वी एक बोट उलटून सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा पूल कधी होणार हा प्रश्न केला जात होता. पावसाळी अधिवेशनात आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता.
कुगाव ते शिरसोडी पूल व्हावा यासाठी आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्यासह या भागातील नेते व नागरिकांची मागणी होती. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या नेत्यांकडे पाठपुरावाही करत होते. अखेर त्याला यश आले आहे. या पुलाचे काम पुणे प्रशासनाकडून केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून भूमिपूजनावेळी उपस्थित राहणार आहेत.
माजी अध्यक्ष डोंगरे म्हणाले, इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा आहे. येथून जीवघेणा प्रवास करताना बळी गेले होते. पुन्हा असे बळी जाऊ नयेत आणि कोणावरही दुःखाचा डोंगर कोसळू नये. या पुलामुळे नागरिकांची सोय होणार आहे. दुर्घटना झाल्यापासून अनेक दिवस येथील बोट बंद होती. मात्र काही नियम घालून पुन्हा वाहतूक सुरु झाली होती. मात्र प्रवास करताना प्रवाशांच्या मनात भीती कायम होती. प्रशासनाने आता हे काम लवकर कसे होईल यावर भर द्यावा.