करमाळा (सोलापूर) : मांगी येथे बिबट्याने एका वासरावर हल्ला करून फस्त केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र हा बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही. त्याने एका वासरावर हल्ला करून फस्त केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या भागात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन पुढील पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनी केली आहे. माजी आमदार शामलताई बागल यांच्या शेताकडील बाजूस हा हल्ला झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शेतात एक गाई व वासरू बांधले होते. मात्र गाई दाव तोडून पळून गेली तर लहान वासरू मात्र बिबट्याने हल्ला करून फस्त केले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून अधिकारी येथे दाखल होणार आहेत, असेही त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.