ZP Election Veet Gat : जे सत्ताधाऱ्यांना जमलं नाही ते केलं, पण आता मतात दिसणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात भाजपचे गणेश चिवटे यांनी त्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांना करमाळा तालुक्यातील वीट जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी या भागात अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला असून येणाऱ्या निवडणुकीत त्याचे मतात रूपांतर होणार का? हे पहावे लागणार आहे. त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल व ते कशी निवडणूक लढवतील? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे १२ गण आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल अशी चर्चा असून सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. वीट गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे. या गटात ३५ हजार ६४३ लोकसंख्या असून त्यात अनुसूचित जाती ४ हजार १७१ तर अनुसूचित जमातीची ७२७ लोकसंख्या आहे. या गटात करंजे, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, शेलगाव क, फिसरे, सौन्दे, हिसरे, हिवरे, वीट, मोरवड, देवळाली, गुळसडी, वंजारवाडी, हिवरवाडी, रोशेवाडी व पिंपळवाडी ही गावे आहेत.

या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरी चिवटे यांनी मात्र पूर्ण तयारी केली आहे. विकास कामांच्या जोरावर आपण ही निवडणूक लढणार असल्याचे ते सांगत आहेत. चिवटे यांनी करमाळ्यात ग्रामीण भागातील शिक्षणासाठी रुमकरून मुक्कामी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत भाजी वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला होता. त्याचा हा उपक्रम राज्यभर गाजला होता. श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजुंना मदत केली आहे. सामूहिक विवाह सोहळा ही कल्पना त्यांनी करमाळ्यात सर्वात प्रथम सुरु केली. त्यालाही खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायातून अनेकांच्या हाताला त्यांनी काम दिले आहे. त्यातून त्यांनी संपूर्ण तालुकाभर कार्यकर्त्यांचेही जाळे तयार केले आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामांसाठी निधी दिला आहे. वीट गटात निवडणूक लढवायची असा निश्चिय करून त्यांनी या भागासाठी विशेष निधी उपलब्ध केला. अनेक कामेही झाली असून याच जोरावर त्यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे मतात रूपांतर होणार का हे पहावे लागणार असून येथे विरोधकांची कोणाला उमेदवारी असले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिवटे यांचे करमाळा तालुक्यात भाजप वाढवण्यात मोठे योगदान आहे.

चिवटे यांचा काय आहे फायदा?

  • चिवटे यांचा या भागात असलेला मोठा जनसंपर्क.
  • जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून अनेक दिवसांपासून रखडलेल्या जनसामान्यांच्या दृष्टीने महत्वाच्या रस्त्यांची केलेली कामे.
  • सत्ताधाऱ्यांवर असली नाराजगी.
  • केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी उपलब्ध होणार
  • कोरी पाटी आणि काम करण्याची असलेली प्रचंड इच्छाशक्ती
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह प्रमुख नेत्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे निधी उपलब्ध होण्यास मदत होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *