करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येथील जागेसाठी करमाळ्यातील भाजपचे गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे व शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत सागर बंगल्यावर गेले आहेत.
बागल की चिवटे? करमाळ्यात महायुतीची जागा नेमकी कोणाला सुटणार
महायुतीत करमाळ्याची जागा भाजपचे दिग्विजय बागल यांना जाईल, असे बोलले जात आहे. मात्र त्याला शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी विरोध केला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येथील जागेचा सस्पेन्स वाढला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनीही मतदारसंघात दौरे केले आहेत. तेही इच्छुक आहेत. मात्र फडणवीस नेमके काय सांगतील आणि भाजपचे पदाधिकारी काय भूमिका घेतली हे पहावे लागणार आहे. ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विनोद महानवर, तालुका समन्वयक काकासाहेब सरडे, नानासाहेब अनारसे, गणेश महाडिक आदी पदाधिकारी सागर बंगल्यावर उपस्थित आहेत, असे अग्रवाल यांनी ‘काय सांगता’शी बोलताना सांगितले आहे.
अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही भाजपचे काम तळागाळापर्यंत केले आहे. त्यामुळे वरिष्ठानी येथे योग्य उमेदवार द्यावा. करमाळा विधानसभा मतदारसंघ हा पारंपारिक शिवसेनेचा आहे तो शिवसेनेला दिला तरी हरकत नाही. मात्र भाजपकडे आला तर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे.’