करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदार संजयमामा शिंदे यांना पुन्हा आमदार करा करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरळीत करू,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जन सन्मान यात्रेतून केले होते. त्यावर भाजपच्या रश्मी बागल यांनी पलटवार केला आहे. ‘मकाईकडे कोणी राजकारणाच्या दृष्टीने मुद्दामहून टीका करून बदनाम करत असेल तर हे यापुढील काळात सहन केली जाणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असे म्हणत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी इशारा दिला आहे.
मकाई सभासदांच्या मालकीचा; सर्वांच्या सहकार्याने काही काळात हा कारखाना पुनर्वैभव प्राप्त करेल
गेल्या आठवड्यात झरे फाटा येथे जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना आमदार करण्याचे आवाहन केले होते. आमदार शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे. तालुक्यातील आदिनाथ व मकाई हे साखर कारखाने व्यवस्थित चालवले जातील, असेही ते म्हणाले होते. बागल गटाचे त्यांनी नाव घेतले नव्हते तरीही हे आवाहन बागल गटाला असल्याचेच मानले जात होते. त्यावर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी उत्तर दिले आहे.
श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत बागल म्हणाल्या, ‘मकाई सहकारी कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. आम्ही फक्त विश्वस्त या नात्याने भूमिका बजावत आहोत. सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे काही काळात हा कारखाना पुनर्वैभव प्राप्त करेल. माजी मंत्री लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांनी मकाईच्या रूपाने एक वारसा परंपरा आपणा सर्वांचे हातात जतन करण्यासाठी दिला आहे’, असे रश्मी बागल म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘मकाईकडे कोणी राजकारणाच्या दृष्टीने मुद्दामहून टीका करून बदनाम करत असेल तर हे यापुढील काळात सहन केली जाणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. मकाईच्या प्रगतीसाठी आम्ही प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे. ही संस्था आम्ही प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्या म्हणाल्या. मकाईमध्ये कोणी राजकारण आणत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.