करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात मोफत जात पडताळणी शिबीर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून करमाळा तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले आहे.
सोलापूर येथे नुकतीच पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध विकास कामे व जात पडताळणीसाठी होणारी आर्थिक लूट याबाबत चर्चा झाली. त्यामुळे करमाळा तालुक्यात मोफत जात पडताळणी शिबीर आयोजित करण्यात यावे या संदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सरचिटणीस काकासाहेब सरडे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे उपस्थित होते.