करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या बागल गटाने श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. याबाबत गटाचे प्रमुख अधिकृतरीत्या निर्णय जाहीर करणार आहेत. याची मात्र प्रतीक्षा आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (शनिवारी) बागल गटाच्या प्रमुखांची करमाळ्यात बैठक झाली. या बैठकीवेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, मार्गदर्शक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, पोथरेचे हरिशचंद्र झिंजाडे, प्रकाश पाटील, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.
या बैठकीत ‘बागल गटाच्या सर्व इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखाना कसा अडचणीत आणला गेला आणि त्याला बागल गटाचा दोष नसताना राजकीय हेतूसाठी बागल गटाला कसे बदनाम करण्यात आले’यावर चर्चा झाली. शेवटी बागल गटाच्या समर्थकांनी दाखल केलेले आपले सर्व अर्ज मागे घेण्याचे ठरले. त्यानंतर पुन्हा कोणाला पाठींबा देईचा का? काय करायचे याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. याबाबत अधिकृत भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाणार आहे.
या बैठकीपूर्वी बागल गटाचे नेते बागल व घुमरे यांनी पोथरे येथे शनीश्वरचे दर्शन घेतले होते. त्यानंतर काही व्यक्तींच्या त्यांनी भेटीही घेतल्याचे समजत आहे. आज बागल गटाच्या नेत्या आणि भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रश्मी बागल या देखील करमाळ्यात येऊन गेल्या होत्या, असे समजत आहे.