करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुक झाल्यानंतर थंड झालेले राजकीय वातावरण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारखान्याची निवडणूक पूर्व तयारी सुरु असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी कारखान्याकडून प्रादेशिक सह संचालक यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
जून २०२२ मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. कोरोनामुळे ही निवडणूक वेळेत झाली नव्हती. दरम्यान ३० जून २०२३ पर्यंत पात्र सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले होते. निवडणुकीसाठी खर्च भरण्याबाबत कारखाना प्रशासनाला सूचित केल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष धंनजय डोंगरे यांनी १० लाख रुपये भरले होते. तेव्हा कारखान्याकडे २९ हजार १६८ मतदार होते. या निवडणुकीसाठी ३५ लाख २९ हजार ३२८ रुपये आवश्यक होते. मात्र कारखाना राहिलेले साधणार २५ लाख रुपये भरू शकत नाही, असे लेखी दिल्याने या कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आले होते.

त्यानंतर कारखान्यावर प्रशासकीय संचालक म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांना संधी मिळाली होती. दरम्यान त्यांनी निवडणुकीसाठी मार्च २०२४ मध्ये राहिलेले पैसे भरण्याबाबत पत्र दिले होते. दरम्यान कारखान्यावर पुन्हा विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, डॉ. वसंतराव पुंडे व दीपक देशमुख यांची प्रशासकीय संचालक म्हणून वर्णी लागली होती.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याने प्रादेशिक सह संचालक यांच्या आदेशानुसार कारखान्याने मतदार यादी पाठवली आहे. कारखान्याकडे सध्या ४०५ सहकारी व २८ हजार ६८७ सभासद आहेत. याची माहिती पाठवण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कार्यवाही होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणे, त्यावर आक्षेप व अंतिम मतदार यादी अशी प्रक्रिया आहे.
कारखाना आर्थिक सक्षम होणे आवश्यक
आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष डोंगरे म्हणाले, ‘कारखान्याची निवडणुक जाहीर झाल्यानंतर बागल गटाचे वरिष्ठ योग्यवेळी निर्णय घेतली. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. हा कारखाना आर्थिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपच्या आमच्या नेत्या रश्मी बागल या पूर्ण प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा कारखाना सक्षम होईल, असा विश्वास आहे.’