करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या ‘गोविंदपर्व’बाबत आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा करत ‘थकीत ऊस बिलाचा आणि प्रा. रामदास झोळ यांचा काहीही संबंध नाही. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे दिले जातील. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या आरोप केला जात आहे’, असे म्हटले होते. मात्र या आरोपाला मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी उत्तर दिले आहे.
संचालक नीळ म्हणाले, ‘सध्या सर्व कारखाने अडचणीत आहेत. कारखाने चालवताना सर्वांचीच कसरत होत आहे हे वास्तव आहे. कारखान्याने सर्व शेतकऱ्यांची देणी दिली पाहिजेत याबाबत शंका असण्याचे कारण नाही. त्यातूनच मकाई, आदिनाथ, विहाळ व कमलाई या कारखान्याविरुद्ध प्रा. रामदास झोळ यांनी शेतकऱ्यांच्या पैशासाठी आंदोलने केली. मात्र गोविंदपर्व कारखान्याकडेही शेतकऱ्यांचे थकीत देणे असताना त्याचा साधा कधी उल्लेखही केला नाही. फक्त बागल गटाला टार्गेट करण्यासाठीच ही आंदोलने होती का? असा प्रश्न त्यांच्या भूमिकेवरून निर्माण होत आहे.’
पोलखोल भाग ४ : ‘गोविंदपर्व’चे प्रा. झोळ हे संचालक असल्याचे पुरावे! जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत ‘काय सांगता’चे प्रश्न?
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘प्रा. झोळ यांना विधानसभा निवडणुकीमुळे कोणीही टार्गेट करत नाही. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ही लोकशाही आहे कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवेल. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही होता. मकाईमध्येही तुम्ही पॅनल देण्याचा प्रयत्न केला. त्यात काय झाले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे विनाकारण हा मुद्दा राजकीय करू नये. गोविंदपर्वच्या थकीत ऊस बिलासाठी प्रा. झोळ हे देखील जबाबदार आहेत,’ असे नीळ म्हणाले आहेत. पुढे बोलताना नीळ म्हणाले, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व नेते दिग्विजय बागल यांच्या माध्यमातून मकाई देखील राहिलेली सर्व बीले लवकरच देणार आहे. त्यामुळे बागल गटाबाबत शेतकऱ्यांनी निश्चित रहावे. (प्रा. झोळ यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्यांचे संपूर्ण म्हणणे ‘काय सांगता’ प्रसिद्ध करणार आहे. मात्र ते कधी भूमिका मांडणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष आहे.) क्रमशः