करमाळा तालुक्यात दोन ग्रामपंचायतीत सरपंच व ११ गावात सदस्यांसाठी होणार पोटनिवडणूक

करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. करमाळा तालुक्यातील दोन ठिकाणी सरपंच व ११ ठिकाणी सदस्याच्या जागा रिक्त आहेत. यासाठी पाच गावांमध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या गावांचा कार्यकाळ संपण्यासाठी सहा महिने राहिले आहेत त्याठिकाणी निवडणूक होणार नाही. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २० तारखेपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २४ तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील कात्रज व रिटेवाडी येथे थेट नारीकांमधून निवड झालेल्या सरपंचानी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त आहे. कात्रजचे आरक्षण सर्वसाधारण महिला असून डिसेंबर २०२४ पासून येथील पद रिक्त आहे. रिटेवाडीचेही आरक्षण सर्वसाधारण महिला असून एप्रिल २०२५ पासून येथील जागा रिक्त आहे.

तरटगाव येथे प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जाती महिला हे सदस्यपद रिक्त आहे. एकच उमेदवार दोन ठिकाणी विजयी झाल्याने एका जागेचा राजीनामा दिल्याने येथील जागा रिक्त आहे. देवळाली, जातेगाव, जिंती, भिलारवाडी, शेटफळ व रोशेवाडी येथील प्रत्येकी एका सदस्याचे निधन झाल्याने जागा रिक्त आहे. याशिवाय कोळगाव व निमगाव येथील सदस्यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झालेली आहे. तर नेर्ले व हिवरवाडी येथील प्रत्येकी एक सदस्य अपात्र ठरल्याने जागा रिक्त झाली आहे. अशा एकूण १३ गावात ११ सदस्य व दोन सरपंचाच्या जागा रिक्त आहेत.

यामध्ये पाच गावांमध्ये पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांनी दिली आहे. कात्रज व रिटेवाडी येथे सरपंच तर तरटगाव, जिंती व भिलारवाडी येथे सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होणार असून येथे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीला मुदत संपण्यासाठी सहा महिने राहिले आहेत. अशा ठिकाणी नियमानुसार पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी निवडणूक होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *