करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील अनेक दिवसांपासून रखडलेले कॅनलचे काम सुरु झाले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी मिळाला होता. या कामामुळे साधारण ८० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. करमाळा पाटबंधारा विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, कालवा निरीक्षक अतुल दाभाडे, बाळासाहेब घाडगे आदींच्या उपस्थितीत पोलिस पाटील भूषण अभिमन्यू व प्रगतशील शेतकरी विकास मुरूमकर यांच्या हस्ते या कामाचे आज (बुधवार) भूमिपूजन झाले.
मांगी तलावातील डाव्या कालव्यातून बिटरगावच्या कॅनलला पाणी येते. कामोणे येथून येणाऱ्या ओढ्यावर बिटरगाव श्री हद्दीत नंदकुमार दळवी यांच्या घरामागे कॅनल क्रॉस होतो. त्यासाठी जुन्या पद्धतीचे सायपण (दोन्ही बाजूला विहिरी घेऊन मध्ये सिमेंट नळ्या टाकणे) होते. मात्र तेच लिकेज झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतून कॅनल जाऊन देखील पाणी मिळत नव्हते. त्यामुळे माजी आमदार शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आमदार असताना पाठपुरावा केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याला निधी मिळाला होता. मात्र टेंडर प्रक्रिया व इतर कायदेशीर प्रक्रिया राहिली होती. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आता हे काम सुरु झाले आहे. या उन्हाळ्यात यातून पाणी मिळेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. भूमिपूजनावेळी रवींद्र दळवी, प्रमोद शिंदे, सुरेश दळवी, संदीप दळवी, मानेश मुरूमकर, हरीप्रसाद दळवी, अशोक मुरूमकर उपस्थित होते.