ट्रॅक्टर- मोटारसायकल धडकप्रकरणात सावडीतील चौघांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सावडी येथील चौघांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सोमवारी (ता. १२) गुन्हा दाखल झाला आहे. निकत जया काळे (वय २७, रा. पारेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून पप्पू प्रल्हाद एकाड (रा. सावडी) व इतर तीन संशयित अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मी पत्नी व मुलीसह मिरजगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त मोटारसायकलवर जात होतो. सावडी फाटा येथे माझी मोटारसायकल आली तेव्हा एकाड यांचा विना नंबरचा ट्रॅक्टर पुढे चालत होता. त्याला मी उजवीकडून ओव्हरटेक करत असताना एकाडने अचानक ट्रॅक्टर उजवीकडे वळवला. त्यात मोटारसायकललाधडक बसली आणि मोटरसायकलसह आम्ही खाली पडली. मी उभा राहून गाडी उभा केली आणि माझ्या बहिणीला याची फोनवरून माहिती दिली. दरम्यान मी ट्रॅक्टरची चावी काढायला गेलो. तेव्हा एकाडने जातीवाचक शिवीगाळ केली. तेथे त्याने इतर तीन व्यक्तींनाही बोलावून घेतले. त्यांची नावे समजली नाहीत.’ काळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करमाळा पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *