करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना पूर्ण केली जाणार असून आदिनाथ व मकाई कारखान्यांना बळ दिले जाईल, असे आश्वासन देतानाच करमाळ्याचे नंदनवन करण्यासाठी महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवारी) केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बागल यांच्या प्रचारार्थ सभा झाली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजप महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मंगेश चिवटे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, करमाळ्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी रिटेवाडी उपसासिंचन योजना करण्यासाठी सर्व्हे सुरु आहे. त्यासाठी आपण निधी दिला आहे. ही योजना महायुती सरकार आल्यानंतर आपण सुरु करणार आहोत. तालुक्यातील आदिनाथ व मकाई या सहकारी साखर कारखान्यांनासाठीही आपण मदत करणार आहोत. करमाळ्याचा सर्वांगानी विकास करण्यासाठी बागल यांना विजयी करा. बागल यांना आपण पूर्ण ताकद देत आहे. त्यांच्या पाठीमागे मी उभा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.