करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा तालुक्यातील चोभेपिंपरी येथे बेकायदा खडी क्रेशर सुरु असून त्याचा शेजारील शेती व जनजीवनावर परिणाम होत आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन बंद करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर १४ महिला व पुरुषांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, ‘चोभेपिंपरी येथे बेकायदा उत्तखनन करून खडी क्रेशर सुरु आहे. बेकायदा वाहतूक करून येथे ध्वनी व वायूप्रदूषण निर्माण होत आहे. याचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे शाळेतील मुलांचे, नागरिकांचे व जेष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिकांवर धुळीचे थर येत आहेत. त्याचाही परिणाम होत असून शेतीच्या कामासाठी कामगारही मिळणे कठीण झाल्याचे म्हटले आहे.’
पुढे म्हटले आहे की, ‘बिगर नंबरच्या वाहनातून बेशिस्तपणे गौण खनिज वाहतूक केली जात आहे. प्रमाणापेक्षा जास्त दगड व खडी भरल्याने अनेकदा रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. स्फोटकांचा वापर कोणतीही सूचना न देता केल्याने जीव धोक्यात आले आहेत. याबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.’ आता गांभीर्याने पाहिले नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जाईल,’ असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अक्षय जाधव, महादेव पवार, पोपट गवळी, चंद्रकांत सातव, अनुराधा पवार, रेश्मा पवार, आशा गायकवाड, शिवाजी पवार, कुबेर गवळी, विनोद अनुबले, अमर जाधव, दत्तात्रय पवार व जगन्नाथ गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
