करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नुकताच खडकी व बिटरगाव श्री येथील पुरसग्रस्तांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. ‘महिला तहसीलदार असताना सुद्धा शिल्पा ठोकडे यांनी सीना नदी पूरस्थितीत अतिशय धाडसाने काम केले. त्यांच्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला’, असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुरग्रस्तांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यामुळे तहसीलदार ठोकडे या देखील भावुक झाल्याचे दिसले.
बिटरगाव श्री येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उभा राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गावात किती नागरिकांची घरे पाण्यात गेली? शेतीचे कसे नुकसान झाले? समोर दिसणाऱ्या तरटगाव बंधाऱ्याची माहितीही त्यांनी घेतली. नागरिकांना सर्वप्रकारची प्रशासन मदत करेल असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केलेल्या कामाची प्रशंसा नागरिकांनी केली. ग्राम महसूल अधिकारी, पोलिस पाटील, कृषी अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या कामाचाही उल्लेख झाला. प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्याकडून त्यांनी आढावा घेतला. दरम्यान घरात पाणी शिरल्याने बिटरगाव श्री येथील सायशा घोडके या विद्यार्थिनीचे दप्तर पाण्यात गेले होते. त्यामुळे तिला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्त्र संपुर्ण शालेय साहित्य देण्यात आले. अत्यंत नम्रपणे नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांनी प्रशासन आपल्याला सर्व प्रकारचे मदत करेल असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटी दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे नुकसान झाले आहे, अशा घरांना दोन दिवसांत प्रत्येकी १० हजार थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक रणजित माने, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत नेटके, मंडळ अधिकारी श्री. राऊत, ग्राम महसूल अधिकारी दिनेश मुरकुटे, ग्रामसेवक भापकर, कृषी सहाय्यक दादा नवले, संतोष पोतदार आदी उपस्थित होते.