करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्राहकांना सेवा देण्याबाबत त्रुटी निर्माण होत असल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकाविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे यांनी दिली आहे.
करमाळ्यात एका पेट्रोलपंपावर चक्क ‘ऑनलाईन बंद’ असल्याचा फलक लावण्यात आला आहे. तर एक पंपावर रोख पैसे दिले जात नसल्याची ग्राहकाची तक्रार आल्यानंतर ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर ग्राहकांची गैरसोय होऊ नये व त्यांना नियमाप्रमाणे सेवा मिळवी म्हणून ग्राहकपंचात यामध्ये लक्ष घालणार आहे. सेवा देण्यात त्रुटी निर्माण करून कोणत्याही ग्राहकाला मनस्ताप होणार नाही याची दक्षता संबंधित पेट्रोल पंप चालकाने घेणे आवश्यक आहे. मात्र करमाळ्यात वेगळेच चित्र असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपासून सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केले जात आहे. साधी भाजी किंवा चहाच्या स्टॊलवर देखील ऑनलाईन पेमेंट होत आहे. अशा स्थितीत करमाळ्यात पेट्रोल पंपांवर ऑनलाईन बंद असल्याचे सांगत ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर ऑनलाईन पैसे दिल्यानंतर एटीएम प्रमाणे रोख पैसेही दिले जात होते. मात्र आता रोख पैसेही दिले जात नाहीत. करमाळ्यातील रिलायन्स पेट्रोल पंपावर ऑनलाईन बंद आहे. त्यामुळे येथे पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ऍड. नरुटे म्हणाले, नियमानुसार पेट्रोल पंप चालकाने ग्राहकांना सेवा देणे आवश्यक आहे. मात्र त्यात कोण हलगर्जीपणा करत असेल तर याबाबत रीतसर तक्रार केली जाईल. यामध्ये प्रशासनाने त्वरित लक्ष घालणे आवश्यक आहे.
पुरवठा विभागाचे अनिल ठाकर म्हणाले, कोणत्याही ग्राहकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित पेट्रोल चाकाला सूचना दिली जाईल. याबाबत सर्व पेट्रोल पंप चालकाची तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या आदेशाने बैठक घेतली जाईल. कोणत्याही ग्राहकाची गैरसोय होणार नाही व नियमाचे पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाईल.
करमाळ्यात पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट बंद!; ग्राहकांना मनस्ताप