करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात कोण काहीही सांगत असले तरी त्याकडे लक्ष देऊ नका येथे महायुतीचा उमेदवार फक्त दिग्विजय बागल हेच आहेत. त्यांना विकासासाठी विजयी करा, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात महायुतीचे उमेदवार (शिवसेना शिंदे गट) दिग्विजय बागल यांच्या प्रचारासाठी मंत्री सामंत यांची सभा झाली. यावेळी उमेदवार दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे, माजी संचालक रमेश कांबळे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, अर्जुनराव गाडे, प्रियांका गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत मम्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विकास कामे केली आहेत. करमाळ्यातील एमआयडीसीचा विकास केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. भविष्यात करमाळ्यात मोठा प्रकल्प आणला जाईल. त्यासाठी बागल यांना या निवडणुकीत विजयी करा,’ असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले करमाळ्यात उद्योगाला गती यावी म्हणून बळ दिले जाईल. येथील विकास फक्त महायुतीच करू शकते, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केला आहे. तुमची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महायुती सरकार काम करत आहे.’
दिग्विजय बागल म्हणाले, ‘करमाळ्याचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीत आहे. मला मतदारांनी संधी द्यावी’. जिल्हा प्रमुख चिवटे म्हणाले, ‘करमाळ्यात एमआयडीसीसह इतर प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न फक्त मुख्यमंत्री शिंदेच सोडवू शकतात. पुन्हा राज्यात महायुती सरकार आणायचे असेल तर करमाळ्यात बागल यांना विजयी करणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करून येथील जागा विजयी केली जाईल’, असे ते यावेळी म्हणाले आहेत.