करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी तरटगावसह परिसरातील विविध प्रश्नाचे निवेदन दिले आहे. या भेटी दरम्यान करमाळा तालुक्यांतील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, आदिनाथचे माजी चेअरमन संतोष जाधव-पाटील, मांगी विकास सोसायटीचे चेअरमन सुजित बागल, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार, तरडगावचे उपसरपंच अभिजीत पाटील, तात्यासाहेब पाटील, डॅा. रोहन पाटील, अंजिक्य पाटील, स्वीयसहाय्यक प्रविण शिंदे उपस्थित होते.
सीना नदीवरील संगोबा व तरटगाव बंधारा या भागासाठी महत्वाचा आहे. पोटेगाव येथील बंधारा नादुरुस्त आहे. या नदीवर लातूरटाईप बॅरेज बंधारे झाले तर या भागाला फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तालुक्यातील तरटगाव, आळजापूर, बिटरगाव श्री, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव, पोथरे, खडकी येथील शेती सीना नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे येथे लातूरटाईप बॅरेज बंधारे उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.