करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनानुसार करमाळा तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेत सहभागी असणाऱ्या शेतकरी गटांनी केल्यामुळे करमाळा तालुक्यात यावर्षी निश्चितच तुरीचे उच्चांकी उत्पादन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती येईल असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांनी केले.
सरपडोह येथे कृषी संशोधन केंद्र बदनापूर, आत्मा करमाळा व जिद्द शेतकरी गट, जिजाऊच्या लेकी शेतकरी गटाच्या वतीने कार्यक्रम झाला. पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, कृषी अधिकारी डी. एल. मोहिते, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे डॉ. दीपक पाटील, वरिष्ठ शाश्त्रज्ञ् (पैदास्कर), डॉ. किरण जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ् (कृषी विद्या), डॉ. ज्ञानदेव मुटकुळे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ्, डॉ. विष्णू गित्ते (पैदास्कर), डॉ. प्रशांत सोनटक्के, रोगशास्त्रज्ञ् तसेच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. अनिल दुर्गुडे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिश्रा म्हणाले, पाणी फाउंडेशन केवळ सामाजिक बांधिलकीतून वॉटर कप, फार्मर कप या माध्यमातून काम करत आहेत. खरं तर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कामच पाणी फाउंडेशन पुढे घेऊन जात आहे. अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीने हे काम केले जात असल्यामुळे पाणी फाउंडेशनची चळवळ ही लोकचळवळ झाली आहे त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याबद्दल मी समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
फिसरे व सरपडोह येथील तुर पिकांच्या प्लॉटची पाहणी कुलगुरू व शास्त्रज्ञांनी केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी केले.पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण ,कृषी अधिकारी डी एल मोहिते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी महेंद्र देशमुख,जयश्री कुलकर्णी ,गणेश देवकर,हनुमंत रोकडे ,अरूण चौगुले,हिराजी राऊत डॉ.विकास वीर या शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक आशिष लाड यांनी केले तर आभार कृषी विभाग आत्माचे अजय कुमार बागल यांनी मानले .याप्रसंगी तालुक्यातील ३५ शेतकरी गटांचे ४०० सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
लवकरच इतर फळ पिकांच्या शेती शाळा सुरू होणार – डॉ.सत्यजित भटकळ.
करमाळा तालुक्यामध्ये फळ पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे .आंबा,पेरू या पिकांच्या शेती शाळा सुरू असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार इतर फळ पिकांच्या शेती शाळा लवकरच सुरू होणार असून महाराष्ट्रातील शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्या यांना आवश्यक ते ज्ञान देण्यासाठी पाणी फाउंडेशन ची टीम सदैव कार्यरत असेल अशी माहिती डॉ.भटकळ यांनी दिली.
एकत्रित तूर विक्रीसाठी प्रयत्नशील…
तालुक्यातील शेतकरी गटांनी शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सर्व एसओपीचे पालन करून अतिशय उत्तम दर्जाची तुर उत्पादित केली असून ही तुर सर्व शेतकरी गट एकत्रितरीत्या विक्रीसाठी प्रयत्न करतील अशी माहिती तालुका समन्वयक आशिष लाड यांनी दिली.