आज सकाळी साधणार पावणेआकरा वाजताच्या दरम्यान एसटी स्टॅण्डवर वैष्णवीला म्हणजे भावाच्या मुलीला एसटीत बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय येथे माझ्या दुर्वाला सोडायला मोटारसायकलवर जात होतो. दुर्वा पहिलीत आहे. तिला घेऊन स्टँडच्या बाहेर पडत असतानाच समोर एक भला मोठा बॅनर दिसला. एरव्ही राजकीय नेत्यांचे बॅनर घेत असलेली ही जागा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या बॅनरने घेतल्याचे दिसले. या बॅनरकडे पाहून माझी चिमुकली दुर्वा जे बोलली ते खूप महत्वाचे आहे. ती म्हणाली ‘पप्पा या मॅडमचा फोटो का व लावलाय? आपल्या गावात पाणी आलं होतं तेव्हा या मॅडम सारख्या येत होत्या ना?’ आता येथे का त्यांचा फोटो लावलाय?’ तिच्या या प्रश्नाने सीना नदीला आलेला पूर आणि एक महिना पाण्याशी गावाने केलेला सर्व संघर्ष अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिला.
राजकारणात काहीही होत राहील! अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा संघर्ष हा मला अजिबात नवीन वाटत नाही. आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली. त्यात त्यांना समर्थन देणारेही तयार झाले आहेत. हा मुद्दा सध्या राजकीय झाल्याचे दिसत आहे. त्यात मला व्यक्तिशः पडायचेही नाही. पण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पूर परिस्थितीत जे सर्वसामान्य माणसांच्या मनात प्रतिमा तयार केली आहे. ती सहज पुसणे शक्य नाही.
सीना नदीला एखादा नाही तर सात दिवसांच्या फरकावर सलग तीनवेळा पूर आला होता. याचा फटका खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, खांबेवाडी, निलज, बोरगाव, बिटरगाव श्री आदी गावांना बसला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी प्रशासनाने होऊ दिली नाही. यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेही योगदान विसरता येणार नाही. पण एक महिला अधिकारी असताना सुद्धा वेळ आणि काळ याचं भान विसरून रात्री सुद्धा ठोकडे मॅडम नागरिकांना गावात जाऊन भेटत होत्या. त्याचे कौतुक करावंच लागेल.
उपमुख्यमंत्री अजितदादा, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या भागाची पाहणी केली. या भागात प्रचंड शेतीचे नुकसान झाले आहे. याच्या खुणा अजूनही आहेत. त्यावर उपाय म्हणून आमदार नारायण आबांनी विधानभवनात थेट कर्जमाफीची मागणी केली. याचाही येथे उल्लेख करावा लागेल. मात्र या सर्व काळात तहसीलदार ठोकडे यांनी त्यांच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना विश्वासात घेऊन जे काम केले ते अतिशय उल्लेखनीय आहे. आणि ते काम जनमानसाच्या मनातून निघणे कठीण आहे.
त्यांच्यावर काही आरोप करत आमदार पाटील यांनी विधानसभेत तक्रार केली आहे. ते आरोप खरे की खोटे यावर मला अजिबात भाष्य करण्याची गरज वाटत नाही. ठोकडे यांनी करमाळ्याचा पदभार घेतल्यापासून महसुलात मोठी वाढ झाली असल्याची माहिती आहे. अनेक घरकुल लाभार्थींना त्यांनी मोफत वाळू वाटप केली आहे. आमसभेत आमदार पाटील यांच्याच हस्ते याचा प्रारंभ झाला होता. तहसील कार्यालयात जप्त करून आणलेली वाळू क्रमशः त्यांनी वाटप केली आहे. अनेक प्रलंबित रस्ता केस त्यांनी मार्गी लावल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबत वेगवेळ्या प्रतिक्रिया आहेत. मात्र पूर स्थितीत त्यांनी अतुलनीय काम केले होते. हे नाकारता येणार नाही. त्यांच्यावर झालेले आरोप माध्यमांपर्यंत यापूर्वी पाटील आमदार पाटील यांच्याकडून कधीही आले नव्हते. मात्र जेव्हा त्यांनी विधानसभेत तक्रार दाखल केली त्याची वेगवेगळी चर्चा सुरु झाली आणि त्यातूनच करमाळ्यात एक भला मोठा बॅनर लागला आहे. त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
- अशोक मुरूमकर, पत्रकार, करमाळा.
