करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात खरीप हंगामातील पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत ४ हजार २४६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करमाळा तालुका कृषी विभागाचे दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान यंदा १ रुपयात पीक विमा ही योजना बंद झाली असल्याने शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसत आहे.
करमाळा तालुक्यात यावर्षी मे महिन्यात विक्रमी पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उडीद, तूर, मका, बाजरी, मूग, सोयाबीन, कांदा, भुईमुगाची पेरणी केली. मात्र पुढे पाऊस लांबला याचा परिणाम होऊन पिके जळू लागली होती. परंतु काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी पाऊस झाल्याने जीवदान मिळाले होते. लांबलेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे.
करमाळा तालुक्यात २३५ हेक्टरवर बाजरी, १० हजार ४८ हेक्टरवर मका, १२ हजार २०८ हेक्टरवर तूर व २१ हजार १५५ हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे. तालुक्यात मे महिन्यात २७१.८ मिलीमीटर पाऊस झाला होता. जूनमध्ये ४३.८ मिलीमीटर तर जुलैमध्ये ३४.७ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या काळात नैसर्गिक घटक व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळाचच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या पिकाचा विमा घेतल्यास शेतकऱ्यांना समप्रमाणत नुकसान भरपाई दिले जाते.