करमाळा (सोलापूर) : येथील नगर रोडवर असलेल्या आयटीआय कॉलेजला विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून एसटी बसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी करमाळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. याबाबत आज (गुरुवारी) करमाळा आगारा प्रमुख विरेंद्र होनराव यांना निवेदन देण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रक श्री. कदम यांनी हे निवेदन स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे की, रोज सकाळी 7 वाजताच्या सुमारास नगर रोड वरील आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी चालत जातात. अनेक विद्यार्थी हे करमाळा तालुक्यातील आसपासच्या गावावरून बसने करमाळयात येतात. करमाळा बस स्टँडवरून आयटीआय कॉलेज ३ किलोमीटर आहे. या रस्त्यात वेगाने वाहने जा-ये करतात. यात विद्यार्थ्याना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथे एसटी बस सुरु करण्याची गरज आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, उपाध्यक्ष आरशान पठाण, यश कांबळे, साहिल पठाण यांच्यासह आयटीआय कॉलेजचे काही विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. कदम यांनी लवकरच मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.