करमाळा (अशोक मुरुमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल कारखान्याच्या खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे सोमवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. त्यापूर्वी उद्या (शनिवारी) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाणार आहे, असे सूत्रांकडून समजले आहे.
शनिवारी व रविवारी बँकेला सुट्टी असल्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार नाहीत. मात्र कारखान्याच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. याबाबत अधिकृत माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर व बागल गटाचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन दिले जाणार आहे, असे सांगितले जात आहे. या पत्रकार परिषदेकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल मिळावे, यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शेतकरी सतत पैसे मागत असल्याने खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी बाहेर फिरणे देखील अवघड झाले होते. मात्र त्यातच हे पैसे जमा झाले असल्याने निंबाळकर यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे असे बोलले जात आहे.