करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याप्रमाणे मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने बिनविरोध झाली त्याप्रमाणे आता श्री आदिनाथ सहकारी साखर कारखानाही बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची जोरदार चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. यामध्ये ‘सरां’चीच मध्यस्थी असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता त्याला किती यश येणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. हा कारखाना अडचणीत आहे. मात्र त्याच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी तब्बल २७२ अर्ज आले आहेत. हा कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले होते. आता सरांच्या माध्यमातून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासाठी मध्यस्थी करणारे नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
१७ एप्रिलला कारखान्यासाठी मतदान होणार असून उमेदवारी मागे घेण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मुदत आहे. अडचणीत असलेल्या या कारखान्याची ही निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील समर्थकांचीही बैठक झाली होती. तालुक्याच्या राजकारणात पाटील यांच्यासह माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाची भूमिका महत्वाची आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या समर्थकांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
पाटील व जगताप हे विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत होत आहे. यामध्ये बागल व शिंदे एकत्र येतील असे बोलले जात आहे. मात्र ते काय करतील हे पहावे लागणार आहे. त्यात सरांच्या माध्यमातून बाजार समितीप्रमाणे कारखाना बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात पुन्हा ‘किंगमेकर’ व ‘मास्टरमाईंड’ चर्चेत आले आहेत. त्यांना किती यश येते हे पहावे लागणार आहे.
बाजार समिती निवडणुकीवेळी जगताप व शिंदे एकत्र होते. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या निर्णयाला शिंदे यांनीही बिनशर्त पाठींबा दिला होता. तेव्हा बाजार समिती जगताप यांच्या ताब्यात देण्यात आली. आता शिंदे व जगताप वेगळे आहेत. बागल कुटुंबियांचे या निवडणुकीत अर्ज नाहीत. मात्र त्यांच्या समर्थकांचे अर्ज आहेत. त्यात ते काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.