करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे दिसत आहे. यातूनच करमाळ्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा फोटो असलेले राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणारे डिजिटल करमाळ्यात झळकले आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले. या निवडणुकीत शरद पवार हे स्वतः करमाळ्यात आले होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था वारे यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती. त्याच सभेवेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जगताप गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सावंत गटाचे सुनील सावंत यांनीही मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. त्याचा परिणाम निकालात दिलासा. मराठा आरक्षण व भाजपविरोधी लाट याचा मोठा परिणाम या निवडणुकीत झाला.
निवडणूक निकाल झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले असल्याचे चित्र आहे. करमाळ्यातील बायपास रोडवर उड्डाणपूलाला एक डिजिटल झळकले आहे. यावर राष्ट्रवादीच्या आठ खासदारांसह शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अभयसिंह जगताप व संतोष वारे यांचा फोटो आहे.