करमाळा : शैक्षणिक कामांसह इतर महत्त्वाच्या कामांकरता जात पडताळणी सोलापूर कार्यालयाकडून कमीत कमी वेळेत पारदर्शीपणे प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भ्रमणध्वनीवरून जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी दिली.
बागल यांनी नुकतीच मुंबईत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांची मंत्रालयात भेट घेतली. सोलापूर जात पडताळणी कार्यालयाकडून जात पडताळणीबाबत होणाऱ्या विलंबाबाबत पत्र दिले होते. त्यांच्याकडे जात पडताळणीसाठी अर्ज दिलेल्या अर्जदारांच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा केली होती. जात पडताळणीच्या त्रुटींबाबत अर्जदारांना ईमेलद्वारे कळवले जाते परंतु अर्जदारांना ईमेलवरील निरोप अथवा संदेश वेळेवर मिळत नाहीत. अनेक अर्जदारांनी आपले अर्ज खाजगी ऑनलाइन सेंटरवरून भरलेले असतात. त्यामुळे अर्जदारांच्या त्यांच्या स्वतःच्या व्हाट्सअप नंबरवर जात पडताळणी कार्यालयाने ज्या काही त्रुटी अथवा कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळवावे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टळेल. अनेक प्रकरणी हेतू पुरस्सर सर्व कागदपत्रांची पूर्तता असूनही एक ते दीड वर्षापासून प्रलंबित आहेत.
सोलापूर जात पडताळणी कार्यालयात सध्या समितीच्या अध्यक्षा म्हणून एक अत्यंत कार्यक्षम व तत्पर महिला अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. परंतु कार्यालयातील इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचेकडून सातत्याने जात पडताळणीची प्रकरणे विलंबनाने पूर्ण केली जातात. कामातही पारदर्शीपणा व गतिमानता दिसत नाही. विशेषतः कुणबी मराठा जात पडताळणीची अनेक प्रकरणे अनेक दिवसापासून कार्यालयात प्रलंबित आहेत. यावर अर्जदारांना नेमक्या काय त्रुटी आहेत किंवा काम होणार आहे किंवा नाही याबाबत कळविले जात नाही. या सर्व मुद्द्यांवर बागल यांनी मंत्री शिरसाट यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अशा प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही जात पडताळणीची कामे वेळेत पूर्ण करून त्याचा तातडीने निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.