करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मांगी तलावासह वीट, कुंभारगाव, पिंपळवाडी, पोंधवडी, कोर्टी या तलावामध्ये कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली आहे. तालुक्यातील इतर प्रश्नाबाबतही त्यांनी निवेदन दिले आहे.
बागल यांनी म्हटले आहे की, ‘जातेगावमध्ये कुकडीच्या पाण्याचे आवर्तन सुरु आहे. ते सुरु ठेऊन इतर तलावांमध्ये सोडण्यात यावे. १४ ते ३१ मे दरम्यान वरकटणे, सौंदे, कंदर, वांगी, शेटफळ, कुगाव, चिखलठाण, वाशिंबे, पारेवाडी, मांजरगाव भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसून केळीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामेही झाले आहेत मात्र शेतकऱ्यांना अद्यापीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
करमाळा तालुक्यातील पाझर तलावांमध्ये सध्या अत्यंत अल्प पाणीसाठा असल्याने कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी तलावांमध्ये सोडणे आवश्यक आहे. उजनी १०० टक्के भरून वाहत असून पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तनही सुरु असून हे पाणी पांडे ओढ्यातून सीना कोळगाव धरणात सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.