करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यातच मध्यप्रदेशातून (इंदोर) येथून मातोश्री देवी अहिल्याबाई होळकर पालखी सोहळा एक आहे. करमाळ्यात या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा मुस्लिम बांधवांकडे आहे. २४ वर्षांपासून तांबोळी परिवार ही सेवा बजावत आहे. आज (गुरुवारी) एमआयडीसी येथे ही दिंडी मुक्कामासाठी आहे. त्यांचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश येथील इंदोरमधील बंसीप्रेस येथील संत ज्ञानेश्वर सेवा भजनी मंडळाच्या वतीने हा पालखी सोहळा काढला जातो. हभप स्वामी प्रेमचंद शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी काढली जाते. चौंढीपर्यंत वहानाने वारकरी येतात. तेथून चालत वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. आज त्यांचा करमाळा येथील दुसरा मुक्काम होता. त्यांची सेवा मुस्लिम बांधवांकडे आहे. याचे नियोजन अल्ताफ तांबोळी हे करतात.
करमाळा येथे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार, वाजिद भाई आदींनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रातूनच मध्यप्रदेशमध्ये कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची ही दिंडी असल्याचे शास्त्री महाराज यांनी सांगितले. या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आरती, गाथावरील भजन व जागर असे दैंनदिन कार्यक्रम या पालखी सोहळ्यात होतात.