Photo : वारकऱ्यांच्या सेवेसाठी रावगावमध्ये उभारले आपत्ती केंद्र! मुक्कामाच्या ठिकाणी यावर्षी प्रमुख पालख्यात एकाच फॉरमॅटमध्ये असणार डिजिटल फलक

करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या पालखीपैकी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा मार्गे जाते. या पालखीतील दिंड्यांच्या माध्यमातून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सुविधा प्रशासन करते. याची कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण बॉडी मसाज ठेवण्यात आले आहे. याशिवाय स्वच्छतागृह व इतर माहितीचे फलक देखील डिजिटल लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्ग समजण्यास सोपे जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी अत्याधुनिक सुविधा असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्रही रावगावमध्ये उभारण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.

आषाढीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या आतुरता प्रशासनालाही असल्याचे दिसत आहे. त्यांच्या स्वागतात व सेवा देण्यात कोणताही उणीव राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा (रावगाव) येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम असतो. शेगूड येथे स्वागत झाल्यानंतर पालखी रवगावात येथे. तेथे प्रशासनाने वॊटरप्रूप मंडप उभारला आहे. येथे एकाचवेळी ५० वारकऱ्यांचे मोबाईल चार्ज होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यात कंदर, जेऊर व रावगाव येथे पालखीची मुक्काम असतो. या तिन्ही ठिकाणी प्रशासनाने यावर्षी स्वच्छतागृहांची संख्या वाढवली आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या पाण्याची तीनवेळा तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय मार्गावरील सर्व हॉटेलमधीलही पाणी तपासले आहे. यामध्ये दोन ठिकाणी दूषित पाणी असल्याचे समोर आले. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गटविकास अधिकारी डॉ. कदम यांनी सांगितले.

डॉ. कदम म्हणाले, ‘रावगाव येथे यावर्षी प्रथमच सर्व सुविधा असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात आरोग्य, वीज, स्वच्छता यासह सर्व विभागाचे प्रमुख थांबतील. त्यामुळे हवी ती वारकऱ्यांना मदत करता येणार आहे. रावगावमध्ये मुक्कामानंतर पालखीला खडतर रस्त्यातून प्रवास करावा लागत होता. मात्र यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काँक्रेटीकरण करण्यात आले आहे. राहिलेल्या मार्गाचेही काम काम काही दिवसात होणार आहे. पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी पोलिस, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. यावर्षी सुविधा मार्गाचे फलक डिजिटल आहेत. आणि विशेष म्हणजे सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेने ठरवून दिलाच फॉरमॅट असल्याने वारकऱ्यांच्या सोईचे होणार आहे’, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *