करमाळा (सोलापूर) : युनियन बँकेच्या करमाळा शाखेबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. येथील शाखाधिकारी बालाजी हारके हे बँकेची सेवा व्यवस्थित देत नाहीत, असा आरोप केला जात आहे.
बँकेकडून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची कर्जप्रकरणे मंजूर होत नसल्याबद्दल तक्रार केली जात आहे. कर्जमागणी करणाऱ्यांना हेलपाटे मारायला लावले जात असून ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांच्यासह खांबेवाडी, जातेगाव, मांगी येथील कर्जप्रकरणे मंजूर न झालेल्या शेतकऱ्यांनी बँक कार्यालयात जाऊन शाखाधिकारी हारके यांना प्रश्न विचारला आहे.
पीएमइजीपी, सीएमइजीपीसह केंद्र व राज्य सरकारच्या योजना, कृषी व विविध विभागांच्या बेरोजगार, शेतकरी, महिला आदीसाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ या बँकेमार्फत दिला जात नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. दरम्यान हारके यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. शाखाधिकारी हारके व नुकतेच येथून बदली झालेले शरद शेवाळे यांनी कर्जवाटप न करून कर्ज मागणीदारांच्या केलेल्या नुकसानीबद्दल न्यायालयात दाद मागण्याचा इशारा येवले यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
जातेगाव येथील अमोल घुमरे, सुनील जगताप, अशोक लवंगारे, राजेंद्र घुमरे, अजय जगताप, सागर माने, शिवाजी तोरडमल, खांबेवाडीचे सुपनवर, राहुल चोरमले, किशोर शिंदे, अण्णासाहेब गोमणे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आशपाकभाई जमादार, मांगीचे ऍड. प्रशांत बागल, तात्यासाहेब काळे- पाटील उपस्थित होते.
करमाळा पंचायत समिती येथील सभागृहात आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक झाली होती. तेव्हा राष्ट्रीयकृत बँकांचे शाखाधिकारी उपस्थित होते. तेव्हाही युनियन बँकेबाबत तक्रार झाली होती. तेव्हा आमदार शिंदे व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी फक्त तुमच्याच बँकेविषयी तक्रारी का आहे? असा प्रश्न केला होता.