करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा मकरसंक्रांतीनिमित्त ५०० रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अंजीर, वड, उंबर या झाडांचा समावेश होता. दादाश्री फाउंडेशनचे काकासाहेब काकडे व आयुषग्राम जिंती व शासकीय आयुर्वेद दवाखाना जिंती येथील आरोग्य अधिकारी बी. एल. गाढवे यांच्या सहकार्यांने ही झाडे देण्यात आली.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री मेहेर, उपसरपंच नानासाहेब झाकणे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा जाधव, मंगल मेढे, रोहिदास शिंदे, सचिन नवले, हभप मंच्छिन्द्र अभंग, श्रीमंत झाकणे आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील उपक्रमांची माहिती रोहिदास शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. शिबिराच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओहळ, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी देवा सारंगकर, गटशिक्षणाधिकारी आदी अधीकारी गावाला भेट देणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी तर आभार सचिन नवले यांनी मानले.