करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीमध्ये ‘ई मॉनिटरींग सिस्टीम’ सुरु झाली आहे. शुक्रवारपासून (ता. १४) सुरु झालेल्या या सिस्टीममुळे एकाच ठिकाणावरून पंचायत समितीमधील सर्व संगणक एकमेकांना जोडले असून यामुळे गटविकास अधिकाऱ्यांचे एकाचवेळी सर्व कामांवर लक्ष राहणार आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या कक्षात एकाच स्क्रीनवर हे सर्व संगणक दिसत आहेत. यामुळे गैरकारभाराला आळा बसणार आहे. पत्रकार अशोक मुरूमकर व पत्रकार विशाल घोलप यांनी याचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले आहे.
सरकारचा गैरव्यवहारावर आळा बसवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. ईटेंडरिंग, घरकुलाचे लाभ, रोजगार हमीतील निधी, सार्वजनिक कामांचे निधी ऑनलाईन लाभार्थ्यांच्या खात्यावर अदा केले जातात. याचे स्टेट्स आता गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्याच कक्षातून पहाता येणार आहेत. कार्यलयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व संगणक ‘एनिडेस्क’च्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातील स्क्रीनला जोडले आहेत. त्यामुळे कोण काय काम करत आहे, संगणकावर कोणते काम सुरु आहे, शासकीय कामाशिवाय अनावश्यक संगणकाचा वापर केला जात आहे का? यावरही गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.
गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, ‘पंचायत समितीमधील सर्व संगणक स्क्रीनवर पहाता येत आहेत. कोणत्या विभागाचे संगणकावर काय काम सुरु आहे यावर यामुळे लक्ष देता येत आहे. ही स्क्रीन समोरच असल्यामुळे कक्षातील आलेल्या नागरिकांनाही कार्यालयात काय काम सुरु आहे हे पहाता येत आहे. त्यामुळे काम चुकरांवरही लक्ष राहणार आहे.’