मुंबई : करोना काळात मुंबईत झालेल्या कथित करोना गैरव्यहावरप्रकरणी ईडीने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे सुजित पाटकर यांच्यासह मुंबईत आज ईडीने १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.
करोना काळात रुग्णालय उभारणीत गैरव्यहवार केल्याच्या संशयातून ही छापेमारी केली आहे. ईडीने छापा टाकलेल्या ठिकाणांमध्ये सांताक्रुझ, मालाड, परळ, वरळी येथील ठिकाणांचा समावेश आहे. २४ ऑगस्ट २०२२ च्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. पाटकर यांच्यासह शिवसेनेचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले आहेत.