सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय गावसाने, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. टि. आर. वळकुंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, आत्माचे उपसंचालक आर. एस. माळी, आत्माचे संचालक रवींद्र पाठक, बोरामणी शेतकरी उत्पादक संघ प्रतिनिधी श्रीमती अनिता योगेश माळगे, शेतकरी उत्पादक संघाचे नागेश कोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आत्मा चा सन 2022-23 राबवलेला कार्यक्रम व लेखापरीक्षण अहवालास मंजुरी, आत्मा सन 2023- 24 मंजूर आवंटना प्रमाणे जिल्हा वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी, सन 2023 -24 माहे सप्टेंबर 23 अखेर प्रगती व नियोजन, आत्मा अंतर्गत संलग्न विभाग विस्तार प्रकल्पास मंजुरी, स्मार्ट योजना आढावा, सेंद्रिय शेती, डॉक्टर पंजाब देशमुख जैविक शेती मिशन आढावा या विषयांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
आत्मा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 10 हजार शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून सप्टेंबर अखेर विविध पिकांचे 4 हजर 221 शेतकरी गटांची स्थापना झालेली आहे. तरी उर्वरित शेतकरी गटाची स्थापना करण्यासाठी आत्माने प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व त्यांना शेतकरी गटाचे महत्त्व पटवून द्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.
जिल्ह्यात सेंद्रिय शेती योजना राबवण्यासाठी मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना विषमुक्त अन्न मिळणार आहे. या योजनेतून स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठे सह थेट बाजार साखळी द्वारे शेतकरी उद्योजक तयार करण्यासाठी आत्मा ने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
प्रारंभी आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र पाठक यांनी आत्मा नियमक मंडळाद्वारे करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली. तसेच जिल्ह्यात दहा हजार शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून त्या दिशेने आत्महत्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून आत्तापर्यंत 4000 पेक्षा अधिक शेतकरी गटाची स्थापना झालेली असून सोलापूर जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. आत्मा च्या वतीने शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या गटांना स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर विविध अद्यावत व नैसर्गिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी उत्साहाने सहभागी होऊन त्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी शेती उत्पादन वाढीसाठी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.