करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या दोघांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सध्या थंड आहे. भाजपने काही प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मात्र शांतताच दिसत आहे. तर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याचे दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार (ता. १९) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच प्रमुख लढत असलेले निंबाळकर व मोहिते पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. निंबाळकर यांनी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले तर मोहिते पाटील यांनी मात्र साधेपणाने अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजपकडून प्रचाराची करमाळ्यात रिक्षा करमाळ्यात फिरत होती. आताही रिक्षा फिरत आहे. मोहिते पाटलांकडून मात्र अजूनही करमाळ्यात जाहीरपणे प्रचार सुरु झाला नसल्याचे दिसत आहे.
मोहिते पाटील व निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. तर निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार असून यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (ए), रयत क्रांती, रासप हे पक्ष आहेत.
निंबाळकर यांना करमाळा तालुक्यातून लीड देण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नियोजन केले आहे. सुजित बागल यांनी त्यांच्या गटातून मताधिक्य देण्याचे जाहीरही केले आहे. सोलापूरला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन त्यांनी केले होते. बागल गटदेखील निंबाळकर यांच्या मताधिक्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना करत आहे. महायुतीने ‘ग्राऊंड’ला आणखी प्रचार यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीने प्रचार सुरु करणे आवश्यक आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी करमाळा तालुक्यात स्वतंत्र, समांतर प्रचार यंत्रणा राबवण्याचे जाहीर केले आहे. वंचितचे रमेश बारस्कर यांचाही अर्ज दाखल झालेला आहे मात्र त्यांचाही प्रचार थंड असल्याचे दिसत आहे.