Exposed factionalism from the banner Patil group banner excluded taluk president

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काल (मंगळवारी) करमाळा येथे झाली. या यात्रेनिमित्त मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवरून मात्र पक्षात पाटील गट आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात गटबाजी असल्याचे दिसले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांनी लावलेल्या बॅनरवर माजी आमदार नारायण पाटील यांचा फोटो होता. मात्र पाटील गटाने लावलेल्या बॅनरवर तालुकाध्यक्ष वारे व बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा फोटो वगळल्याचे दिसत होते. हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधत होते. त्यावरून राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळ्यात आले होते. बाईक रॅली दरम्यान सुळे या तालुकाध्यक्ष वारे यांच्या मोटारसायकलवर बसल्या होत्या. या रॅलीच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. शिवस्वराज्य यात्रा येणार याची तारीख निश्चित झाली तेव्हापासूनच पाटील गटाकडून सोशल मीडियावरही पोस्ट सुरु झाल्या होत्या. त्यात तालुकाध्यक्ष वारे यांचा फोटो नव्हता.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) समस्त पदाधिकारी करमाळा तालुका असा संयोजक म्हणून उल्लेख असलेले एक डिजिटल होते. त्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुळे, कोल्हे, मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचा फोटो होता. काही डिजिटलवर आमदार रोहित पवार यांचा फोटो होता. तर काही बॅनरवर वरिष्ठ नेत्यांच्या फोटोसह जेऊरचे सरपंच माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांचा व देवानंद बागल यांचा फोटो होता. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केलेल्या या डिजिटलवर कोठेही तालुकाध्यक्ष वारे यांचा फोटो नाही.

पाटील गटाने फोटो वगळल्यानेचे तालुकाध्यक्ष वारे यांनी स्वतंत्र बॅनर लावलेलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. वारे यांनी लावलेले बॅनर आणि पाटील गटाने लावलेले बॅनर शेजारी शेजारी होते. त्यावर कोणाचे फोटो आहेत आणि कोणाचे नाहीत हे लक्ष वेधत होते. विधानसभा तोंडावर असल्याने पाटील गटाने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना डावलने महागात पडू शकते. तालुक्यात पाटील गट मोठा असला तरी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचेच पदाधिकारी बॅनरवरून डावलले जात असतील तर वेगळे चित्र निर्माण होईल, असे खासगीत कार्यकर्ते सांगत आहेत.

मोहिते पाटील लोकसभेत विजयी झाल्यानंतर करमाळा दौरा झाला होता. तेव्हाही काही ठिकाणी शरद पवार यांचाच फोटो नसल्याचे दिसले होते. पाटील गटाला सध्या वातावरण चांगले असले तरी अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वरिष्ठांनीही जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालणे आवश्यक आहे. शहराध्यक्ष ऍड. शिवराज जगताप व त्यांचे इतर सहकारी हे देखील शिवस्वराज्य यात्रेत दिसले नाहीत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *