सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य सरकारने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक असून अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेणास पात्र असतील मात्र भाडेपट्टीने शेती करणा-या नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडे करार पिक विमा संकेत स्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
या योजनेतंर्गत खालील जोखिमबाबींचा हंगाम 2024 करिता समावेश करण्यात आला आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी व लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान सर्वसाधारणपणे पेरणी व लावणी नंतर 30 दिवस व काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत या कालवधीत पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्र स्तरावर विमा संरक्षण देय राहील.
पिक पेरणीपासून काढणी पर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट टाळता न येणा-या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.
तसेच ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी व काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडयांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीम अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅप (Crop Insurance App)/ संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल. जिल्हयात खरीप 2024 साठी ओरियंटल इंन्सुरन्स कंपनी लि या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून 1800118485 हा टोल फ्री. क्रमांक आहे
बिगरकर्जदार शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहीत मुदतीपुर्वी नजीकचे बँक / आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेणेबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.
विमा योजनेंतर्गत विविध जोखीमींतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्चित केले जाते. जिल्हयात खरिप हंगाम 2024 मध्ये खरीप ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, कापूस उडीद, तूर, मका, व कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. खरिप पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम भुईमुग 29 हजार रुपये, खरीप ज्वारी 25 हजार रुपये बाजरी 22 हजार रुपये , सोयाबीन 45 हजार रुपये, मूग-20 हजार रुपये, उडीद 20 हजार रुपये, तूर 35 हजार रुपये , कापूस 23 हजार रुपये, मका 6 हजार रुपये कांदा 65 हजार रुपये या प्रमाणे राहिल.
या योजनेत सहभागासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. शेतक-यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी. पिक विमा भरताना शेतक-यांनी आपल्या बँकेचा खाते क्र., पिकाखालील क्षेत्र, भुमापनक्रं. मोबाईल क्रमांक ई. खातर जमा करावी जेणेकरुन भविष्यात पिक विमा मंजुर झाल्यानंतर तक्रारी उद्भवणार नाहीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.