एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला! अंजनडोहवर शोककळा, करमाळा तालुक्यात हळहळ

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- वीट दरम्यान दुचाकी व कारमध्ये भीषण अपघात होऊन अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघांवर आज (शनिवार) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ठार झालेल्यामध्ये पती- पत्नी व विवाहित बहिणीचा समावेश आहे. घटनेची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कारमधीलही व्यक्ती जखमी आहेत. त्यात एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. हनुमंत केरु फलफले (वय 35), कांचन केरु फलफले ( वय 30, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (वय 25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कांचन या हनुमंत फलफले यांच्या पत्नी आहेत. तर स्वाती काशीद या बहिण आहेत. अंजनडोह येथील यात्रेसाठी स्वाती या माहेरी आल्या होत्या. त्या तिघांवरही काळाने घाला घातला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकलचा पूर्णपणे चक्कचुर झाला आहे. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. कारमधील राजू विनोद धोत्रे (वय 19), जयश्री विनोद धोत्रे (वय 45), भारत पंजाबी (वय 45), ईशान सोनी (वय 19), विनोद धोत्रे (वय 50) व राहुल विनोद धोत्रे (वय 23, रा. सर्व पुणे पूर्ण माहिती समजू शकलेली नाही) तर कार्तिक दत्तात्रय होले (वय 3) व अर्पणा दत्तात्रेय होले ( वय २५, रा. धेलेवाडी, ता. कर्जत) अशी जखमींची नावे आहेत.

जखमी व मृत्यू झालेल्या व्यक्तींना माजी सैनिक रुग्णवाहिकेने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. अपघातग्रस्तांना नवनाथ जाधव, बिभीषण ढेरे, आनंद किसवे, रेवनाथ जाधव यांनी मदत केली. अपघाताची माहिती समजताच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित माने व त्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *