करमाळा (अशोक मुरूमकर) : डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून त्यांच्याबाबत श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. डॉ. जाधव पाटील यांचे मुळगाव तरटगाव आहे. वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलकडे त्यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावना…
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांचे निधन
खासदार धैर्यशील मोहिते पाटील
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अपार प्रेम असलेला माणूस म्हणजे डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील! ते स्पष्ट वक्ता होते. त्यांचा फक्त सहकारात चांगला अभ्यास नव्हता तर वैद्यकीय क्षेत्रात चांगले नाव होते. आमच्या सारख्या युवकांना ते चांगले मार्गदर्शक होते. वेळोवेळी त्यांच्याबरोबर चर्चा होतहोती. त्यांच्याबरोबरची एक आठवण सांगताना खासदार मोहिते पाटील म्हणाले, विजयदादा लोकसभा निवडणुकीत उभा होते तेव्हा मांगी येथे बैठक झाली होती. तेथे राजेभोसले यांनी भाषणात सांगतिले होते की मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना बागल गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात तेव्हा डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील हे भाषणात म्हणाले होते आपल्या सर्वांचा उगम हा मोहिते पाटील यांच्या गटातून आहे. तुम्ही जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. एवढा स्पष्ट वक्ता ते होते. विजयदादा व सहकारमहर्षी यांच्यावर नितांत प्रेम करणारी ती व्यक्ती होती. त्यांच्या जाणणे खूप मोठी पोकळी तयार झाली आहे.
आमदार संजयमामा शिंदे
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील हे सहकार व वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले नाव आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले. आबा दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य लोकांना निष्णात सर्पदंश तज्ञ म्हणून परिचीत होते. एखाद्या गरीब रुग्णाला उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून तो कधीही त्यांच्या दवाखान्यातून परत गेला नाही, असे प्रेमळ आबा आपल्यामधून गेल्यामुळे करमाळा तालुक्याच्या सहकार व वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या जाण्याने करमाळा तालुक्याच्या सहकारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले आहे. आदिनाथ कारखान्यासह सहकारी संस्था कशा चालवायच्या त्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. माझे वडील स्व. दिगंबरराव बागल यांचे ते अत्यंत जवळचे होते. त्यांच्या जाण्याने अतिशय दुःख झाले आहे. सहकारामध्ये नवीन व जुनीपिढा यांचा मेळ घालत त्यांनी मार्गदर्शक असे काम केले आहे.
माजी आमदार नारायण पाटील
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील व त्यांचे बंधू संतोष पाटील आणि माझे कुटुंब यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी आदिनाथ कारखान्यामध्ये अतिशय चांगले काम केले. डॉ. जाधव पाटील यांच्या निधनाने करमाळा तालुक्यात राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लागो ही ईश्वर चरणी पार्थना.
माजी आमदार जयवंतराव जगताप
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील आणि मी एका वर्गात होतो. त्यांचे वडील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते. ते माझे गुरु होते. शालेय शिक्षण सुरु असताना आमची मैत्री होती ती शेवटपर्यंत कायम होती. आमच्यात राजकीय मतभेद झाले पण मैत्रीत कधीच ते दिसले नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा डॉ. रोहन पाटील आणि माझी भेट झाली होती तेव्हा डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आमच्यात राजकीय विचारांचा संघर्ष होता. मात्र मैत्रीत तो कधीच नव्हता. त्यांनी आदिनाथ कारखान्यामध्येही काम केले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते डॉक्टर झाले. सीना काटाच्या सात गावात त्यांनी सायकलवर रुग्णसेवा दिली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना.
पोलखोल भाग ३ : ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, स्वाभिमानीच्या भूमिकेत बदल
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील व आम्ही राहायला शेजारी होतो. त्यांची संपूर्ण वाटचाल मी जवळून पाहिली आहे. सहकारात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. तालुक्याचे राजकारण करण्याची त्यांच्यात ताकद होती. त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. त्यांचे सर्वांशी खूप चांगले संबंध होते. डॉ. जाधव पटील यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या अनेक आठवणी समोर आल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील व माझी फक्त राजकीयच नाही तर आराजकीय मैत्री होती. ते सर्व समजाना बरोबर घेऊन जाणारे होते. आज करमाळा तालुक्याने त्यांच्यासारखा अनमोल हिरा गमवला आहे. त्यांच्या निधनाची माहिती समजताच प्रचंड वाईट वाटले. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान मोठे आहे. पैसे नसताना त्यांनी अनेकांना मदत केली. सर्पदंश झालेल्या रुग्णाना त्यांनी जीवदान दिले आहे. परिसरात त्यांची मोठी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्यामुळे माझी अनेक डॉक्टरांशी ओळख तयार झाली होती. पाटील हे कधीच पाटील म्हणून वावरले नाहीत त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन काम केले. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात कांबळे परिवार सहभागी आहे.