करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री. मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही गटाने जाहीर प्रचार केला नाही. घरोघरी भेटी देण्यावरच भर देण्यात आला होता. सत्ताधारी बागल गटानेही या प्रचाराची धुरा कार्यकर्त्यांवर सोपवली होती. प्रमुख नेते मात्र माध्यमांपासूनही दूर राहिल्याचे दिसत आहे. प्रचार शेवटच्या क्षणात आलेला असताना बागल विरोधी गटाचे बॅनर सोशल मीडियावर झळकले असून त्यावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा फोटो झळकला आहे.
करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक न्यायालयीन लढाईनेच जास्त गाजली. सत्ताधारी बागल गटाला रोखण्यासाठी मकाई परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून प्रा. रामदास झोळ हे मैदानात उतरले. पण कारखान्याच्या नियमात त्यांचे अर्ज अपात्र ठरले. मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचेही अर्ज अपात्र ठरले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनीही जिंती येथे जाऊन प्रयत्न केले असल्याची माहिती आहे. मात्र त्यांनाही यश आले नाही.
सोमवारपर्यंत अर्ज पात्र की अपात्र ही लढाई सुरु होती. त्यामुळे प्रचाराला वेळ कमी राहिला. आणि विरोधी गटाला शेवटपर्यंत नेमके काय होणार हे हे समजू शकले नाही. पॅनल पूर्ण होणार की आहे त्या जागा लढायचे हा संभ्रम होता. अजूनही न्यायालयीन लढाई संपलेली नाही. मात्र आता प्रचारावर फोकस केला असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर विरोधी गटाचे बॅनर झळकले आहेत. श्री मकाई परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे. यावर माजी आमदार जगताप, शिंदे गटाचे समर्थक वामनराव बदे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे यांचा फोटो आहे.
बागल गटाचे प्रमुख मात्र माध्यमांपासून दूर
मकाई सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. हा कारखाना सध्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र शेवटच्या दिवशी पाच ठिकाणचे अर्ज राहिल्याने नऊ जागांवर निवडणूक लागली. या कारखान्यात बागल गटाच्या आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक लागलेल्या ठिकाणीही बागल गटाच्या पाच जागा येणार आहेत. या निवडणुकीत बागल गटाचे प्रमुख नेते मात्र माध्यमांपासून दूर आहेत. प्रचारावेळीही माध्यमांना माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतरही प्रमुख नेते कारखान्याबाबत माध्यमांशी अधिकृतरीत्या काहीच बोलत नाहीत.