करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात पर्यटनासोबतच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी सरकारकडून २८२.७५ कोटी उजनी जलाशय, जलपर्यटन, धार्मिक, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन विकासाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली होती. या पर्यटन विकास आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनासाठी २५ कोटी निधीला मंजुरी मिळालेली होती. त्यातील ५ कोटी निधीची कामे करमाळा तालुक्यातील कमलाभवानी मंदिर परिसरात केली जाणार आहेत. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे कमलाभवानी मंदिर राज्याच्या, देशाच्या पर्यटन नकाशाध्ये झळकेल, असा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
पाच कोटी निधीपैकी दोन कोटी २० लाख निधीमधून श्री कमलादेवी मंदिरात सीसीटीव्ही देखरेख प्रणाली, ऑन ग्रिड सोलर रूफ टॉप सिस्टम, स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट, गार्डन लाईट, विद्युतीकरणाचे काम आणि संगीतमय कारंजे ही कामे केली जाणार आहेत. तर २ कोटी ८० लाख निधीमधून मंदिर सुधारणेची कामे केली जाणार आहेत.
श्री. कमलाभवानी हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आहे. हे देवस्थान करमाळा शहराच्या लगत असून या देवस्थानचा विकास करण्यासाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी ४ कोटी निधी मंजूर केला होता. त्यामधून पेविंग ब्लॉक बसविणे २४ लाख, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे ७६ लाख, रस्ते डांबरीकरण करणे ४७ लाख, भक्तनिवास बांधणे ८० लाख, स्वच्छतागृहसाठी २१ लाख ५० हजार, वॉल कंपाऊंड बांधणे १ कोटी ४३ लाख, स्ट्रीट लाईट १५ लाख ही कामे पूर्ण झालेली आहेत.
