करमाळा (सोलापूर) : साखर निर्यात अनुदान गैरव्यहवारप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाईची निश्चिती करावी, असा ठराव श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे, अशी माहिती आदिनाथचे प्रशासकीय सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा काल (शुक्रवारी) झाली. प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेवेळी चिवटे यांच्यासह प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, डॉ. वसंत पुंडे, प्रा. रामदास झोळ, प्रा. सुहास गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संतोष खाटवडे पाटील, प्रा. शिवाजीराव बंडगर आदी उपस्थित होते.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने यावर्षी चालवून ऊस उत्पादक कर्मचारी व ऊस वाहतूकदार यांना न्याय दिला जाणार आहे. सर्वसामान्यांचे हित जपण्याचे काम केले जाईल, असा विश्वास बेंद्रे यांनी सभासदांना दिला आहे. तीन तास चाललेल्या या सभेत प्रा. गलांडे म्हणाले, या सर्वसामान्य सभासदाला मत मांडण्याची संधी मिळाली. गुटाळ म्हणाले, यावर्षी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यंत कमी खर्चात कारखाना सुरू करत असून बाहेर देणारी जॉबवरची कामे कारखान्यातच कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे यावर्षी कारखान्याचा लाखो रुपये फायदा झाला आहे.
2020- 21 मध्ये आदिनाथ कारखान्यात साखर शिल्लक असताना आदिनाथ कारखान्याला मिळालेले निर्यात कोटा साखर व्यापाऱ्यांना विकण्यात आला. यातून आलेला पैसा गैरमार्गाने साखर निर्यात केल्याचे कमिशन म्हणून संबंधित व्यापाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, असा आरोप यावेळी करण्यात आला. कारखान्याची गाळप क्षमता 7500 मॅट्रिक टन करावी व पाच लाख लिटर डिस्लरी इथेनॉल प्रकल्प उभा करावा या ठरावालाही यावेळी मान्यता देण्यात आली आहे. यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला काटा पेमेंट देणे व ऊस वाहतूकदारांना रोजच्या रोज वाहतूक भाडे देणे, कर्मचाऱ्यांच्या पगारी दर महिनाकरणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही बेंद्रे यांनी सांगितले.
भंगार विक्रीतून आलेली 65 लाख रुपयांच्या रकमेचा हिशोब सभासदांपुढे मांडण्याचे सांगण्यात आले. या काळात कारखाना बंद असताना हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न सभासदांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.