करमाळा (सोलापूर) : येथील सकल मुस्लिम समाजच्या वतीने 39 वर्षाची परंपरा यावर्षीही कायम राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवेळी जामा मशीदमधून पुष्पगुष्टी होणार आहे, अशी माहिती जामा मशीद ट्रस्टचे विश्वस्त व सकल मुस्लिम समाजचे अध्यक्ष जमीर सय्यद यांनी दिली आहे.
सय्यद म्हणाले, मानवतेचा सलोखा करमाळा शहर व तालुक्यात कायमस्वरूपी टिकून राहावा या महत्त्वकांक्षेने सकल मुस्लीम समाज जामा मशीदमधून गणरायाच्या विसर्जन मिरवणूकवेळी करमाळा शहरातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करणार आहे. मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचाही सन्मान केला जाणार आहे. हा सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण राज्यभरात राबवला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
गणपती विसर्जनामध्ये बंदोबस्त ठेवणारे पोलिस बांधव व त्यांचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार व तहसीलमधील उपस्थित कर्मचारी यांचाही सन्मान जामा मस्जिद ट्रस्ट, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लिम समाज करमाळा बांधवांच्या वतीने केला जातो. सकल मुस्लीम समाजचे अध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे मार्गदर्शक समीर शेख, आझाद शेख, रमजान बेग, सुरज शेख, सोहेल पठाण, दिशान कबीर, जहाँगीर बेग, आलिम पठाण, शाहीद बेग, इकबाल शेख, कलंदर शेख, आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुपरान शेख, बबलु पठाण, कलीम शेख, आरीफ पठाण, कय्युम मदारी, ईरफान सय्यद, अय्युब मदारी, अरबाज शेख यासाठी परिश्रम घेतात.