करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गणेशोत्सव मिरवणुकीवेळी शहरात विजेच्या तारा अडथळा ठरतात’, ‘काही मंडळांना मिरवणुकीत वेळ कमी पडतो. सर्वांना समान वेळ मिळावा’, ‘ग्रामीण भागातील मंडळांचाही सन्मान व्हावा’, असे प्रश्न करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत मांडण्यात आले. दरम्यान ‘विजेच्या तारांची उंची वाढवणे शक्य नाही त्यामुळे देखाव्यांची उंची कमी करा’ असे सूचित करण्यात आले. ‘हा उत्सव शांतते करा. अटींचे पालन करा’, असे आवाहन करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी केले. तर ‘साउंड सिस्टीमचा नियमापेक्षा जास्त आवाज ठेऊ नका डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे’ आवाहन पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात शांतता समितीच्या बैठकीला निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, पंचायत समितीचे कक्षाधिकारी श्री. जरांडे, महावितरणचे श्री. कलावते यांच्यासह राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, सावंत गटाचे सुनील सावंत, भाजपचे शशिकांत पवार, फारूक जमादार, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण यांच्यासह तालुक्यातील पोलिस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस पाटील संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक माने, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा व महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे करमाळा उपविभागाचे कार्यकारी अभियंता कलावते यांनी मार्गदर्शन केले.
धार्मिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम बांधवांचा निर्णय
मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैंगबर जयंती यंदा ५ सप्टेंबरला आहे. गणेशत्सवादरम्यान ही जयंती आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ९ सप्टेंबरला साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे या बैठकी दरम्यान मुस्तमिक पठाण यांनी सांगितले. या निर्णयाचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले.
‘करमाळा शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्सहात साजरा करण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करावे. नियमापेक्षा जास्त साऊंडसिस्टीमचा आवाज ठेऊ नये. उत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. चांगले काम करणाऱ्या मंडळांचा सन्मान केला जाणार आहे. गणेशमूर्तीची विटंबना होणार नाही यासाठी सर्व गणेश भक्तांनी काळजी घ्यावी. डीजे मुक्त मिरवणूक काढण्यावर भर द्या, जास्त आवाज असेल तर लगेचच सिस्टीम जप्त केली जाईल.’
– रणजित माने, पोलिस निरीक्षक करमाळा
‘गणेशोत्सव काळात सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. गणेशमूर्ती योग्य उंचीवर ठेवा. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मंडळाचे दोन पदाधिकारी कायम मूर्तीच्या जवळ ठेवावेत. तेथे कोणीही जुगार किंवा बेकायदा कृत्य करू नये. आवाजाची मर्यादा ठेवावी. सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी गाणे वाजवू नयेत.’
– अंजना कृष्णा, उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा
‘गणेशउत्सव काळात वीज महत्वाची आहे. वीज नसेल तर उत्सवाला शोभा नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मंडळांनी व्यवस्थित रित्या वीज घ्यावी. उत्सव काळात कमी दरात वीज उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे मंडळांनी याचा लाभ घ्यावा. बेकायदा वीज घेणे टाळावे. करमाळा शहरातील वीज तारांची उंची वाढवणे सध्या शक्य नाही. त्यामुळे मंडळांनी देखाव्याची उंची योग्य ठेवावी.’
– श्री. कलावते, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, करमाळा उपविभाग
बैठकीत काय झाली चर्चा
- सामाजिक देखाव्यांवर भर द्या
- नागरिकांना देखावे पहाता यावेत आणि गर्दी टाळण्यासाठी दोन दिवस देखावे करा आले तर पहा
- ग्रामीण भागात एक गाव एक गणपती करण्यावर भर द्या
- नियमांचे पालन करा
- सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा गौरव होणार