करमाळा (सोलापूर) : सततचा बिघाड आणि प्रवाशांच्या तुलनेत कमी बस असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप करावा लागत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा आगारासाठी तातडीने ३० नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
माजी आमदार जगताप म्हणाले, करमाळा आगाराकडे एसटी बसची संख्या कमी आहे. आहेत त्यापैकी अनेक बस नादुरूस्त आहेत. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. करमाळा आगाराला ८५ बसेसची आवश्यकता असताना केवळ ६५ बसवर सेवा दिली जात आहे. त्यापैकी काही बस नादुरुस्त आहेत. त्यामुळे गाड्या फेल होणे, रद्द होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. शालेय विद्यार्थी, रुग्ण व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्व. नामदेवराव जगताप यांनी राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना करमाळा येथे भव्य बसस्थानक व वर्कशॉपची उभारणी केली होती. शेकडो तरुणांना त्यांनी एसटी महामंडळात रोजागाराची संधी दिली. त्यामुळे माजी आमदार जगताप यांच्या मागणीला विशेष महत्व आहे.