करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांच्याबाबत आठवण सांगितली.
माजी आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाची धक्कादायक बातमी कळली व व्यथित झालो. मी व अजित पवार जवळपास समवयस्क. आमचे मैत्रीचे व अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आमचा राजकारणातील प्रवेश देखील एकाचवेळी झाला. १९९० मध्ये मी विधानसभेवर तर अजितदादा १९९१ ला लोकसभेवर गेले. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी, जयंत पाटील, सुभाष कुल आदी तरूण मंडळी कार्यरत होतो. महाराष्ट्राचे सरकार असो, राज्य सहकारी बँक अथवा सहकार क्षेत्र असो अजित पवार यांचा प्रचंड दरारा व प्रशासनावर वचक होता. कार्यकर्त्यांना ताकद देणारा त्यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही. मी दोन वेळेस आमदार असताना व सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये व आदिनाथचा चेअरमन असताना शिखर बँकेच्या माध्यमातून त्यांनी केलेली मदत करमाळा तालुक्यातील नागरिक कधीही विसरणार नाहीत. पवार कुटुंबीयांच्या दुःखात मी व्यक्तीशः सहभागी आहे. मी करमाळा तालुक्याच्या व जगताप कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
