करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’वर ते रिंगणात उतरणार आहेत.
करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी हे घटक पक्ष आहेत. माजी आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली होती. तेव्हापासून पाटील यांनाच उमेदवारी मिळेल असे मानले जात होते.
‘तुतारी’साठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यात पाटील यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल, असे बोलले जात आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार पाटील यांना २०१९ मध्ये ७३ हजार ३२८ मतदान झाले होते. तर आमदार शिंदे यांना ७८ हजार ८२२ मतदान झाले होते. २०१४ मध्ये पाटील यांना ६० हजार ६७४ मते मिळाली होती. तर आमदार शिंदे यांना ५८ हजार ३७७ मते मिळाली होती. यावेळी रश्मी बागल यांना ६० हजार ४१७ मते मिळाली होती. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप हे देखील रिंगणात होते त्यांना १४ हजार ३४८ मते मिळाली होती.
आता होत असलेल्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. बागल गटाकडून दिग्विजय बागल हे निवडणुकीत उतरतील असे चित्र आहे. या लढतीत प्रमुख लढत पाटील व शिंदे यांच्यात असल्याची मानली जात आहे. महाविकास आघाडीकडून पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असून महायुतीकडून बागल की शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांना उमेदवारी मिळणार याकडे लक्ष आहे. आमदार शिंदे यांच्या कार्यकर्ते आमदार शिंदे यांनी अपक्ष उतरावे असा आग्रह करत आहेत. त्यामुळे ते अपक्ष लढतील, असे बोलले जात आहे.