करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदारांनी माझ्यापुढे येऊन किती निधी आणला हे स्पष्टीकरणासह सांगावे’, असे म्हणत माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे नाव न घेता खुले आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झालेले नसली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार शिंदे यांना घेरण्याचा पाटील गटाकडून प्रयत्न सुरु झालेला आहे. त्याची झलक आज (बुधवारी) करमाळा तहसील कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आली.
करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी नवीन जागेत तहसील कार्यालयाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण देत ‘जनमताचा आदर केला जाईल. नागरिक सुचवतील त्याच ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन होईल’, असे सांगितले होते. त्यानंतर पाटील गटाने आज तहसील कार्यालयासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. ‘आमदार शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार कोटी निधी आणला’, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते. त्याचा समाचार माजी आमदार पाटील यांनी घेतला.
माजी आमदार पाटील म्हणाले, ‘करमाळ्यातील तहसील कार्यालयाचे स्थलांतर होत आहे हे मी मोहिते पाटील व पवार यांच्या कानावर घातले होते. हे कार्यालय आहे त्याच ठिकाणी राहणे आवश्यक आहे. येथे जवळच शाळा व महाविद्यालय आहे. त्यामुळे हे कार्यालय सर्वांउपयुक्त आहे. याचे स्थलांतर करणे चुकीचे आहे. ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.’
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही सांगत असलेला एवढा निधी कोठून आणला? पैसे नसताना फक्त उदघाटनाचा धडाका लावलेला आहे. सन्माननीय आमदारांनी असं समोरासमोर येऊन सांगाव मी येथे कामे केली आणि तिथे कामे केली. मागे चर्चा करायची आणि चुकीचे काही तरी सांगायचे आणि नागरिकांची दिशाभूल करायची असा प्रकार सुरु आहे. करमाळा तहसीलच्या स्थलांतराबाबत तुम्ही स्पष्टीकरण दिले होते. पण तरीही ते त्यांचा हेका पुढे नेहत असतील तर आम्ही सहन करणार नाही’ असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.