करमाळा (अशोक मुरूमकर) : दमदार पाणीदार… आबाच पुन्हा आमदार… म्हणत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा रविवारपासून (ता. ९) निंभोरे येथून संपूर्ण मतदारसंघात ‘जनसंवाद’ दौरा सुरु होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला जात असून संपूर्ण मतदारांघात हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वाडी- वस्तीवर माजी आमदार पाटील हे जाणार आहेत, यामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील गटाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत. या विजयामुळे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. येत्या काही दिवसात विधानसभा सभा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार असून त्या दृष्टीने पाटील गटाने काढलेल्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ यांची शिवसेना सोडत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला होता. या निवडणुकीत मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार केला होता. प्रत्येक गावातील कार्यकर्ते एकत्र करत त्यांनी प्रचार केला होता. त्याचा परिणाम निवडणुक निकालात दिसून आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊत्साहाचे वातावरण आहे. त्यातच आता माजी आमदार पाटील यांचा आता जनसंवाद दौरा होत आहे.
माजी आमदार पाटील हे रविवारी सकाळी ९ वाजता निंभोरे येथून दौरा सुरुवात करत आहेत. त्यानंतर घोटी येथे सकाळी ११ वाजता, वरकुटे येथे १ वाजता, नेर्ले येथे ३ वाजता, पाथुर्डीत ५ वाजता व मलवडीत ७ वाजता पाटील भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.