करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेला (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) धक्का देत माजी आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (शरद पवार गट) उद्या (शुक्रवारी, २६ एप्रिल) प्रवेश करणार आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर याची जयंत तयारी सुरु आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ यावेळी सभाही होणार असून यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी पाटील गट, मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहेत.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला करमाळा तालुक्यात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशाचे पाटील गटाकडून सोशल मीडियावर पोस्टर लॉन्च झाले आहे. त्यावर शरद पवार व माजी आमदार पाटीलस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे फोटो आहेत. पाटील समर्थक सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य देखील यावेळी ‘तुतारी’ हाती घेणार आहेत.
माजी आमदार पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होते. दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्येही त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद मिळाले होते. माजी आमदार पाटील हे मोहिते पाटील समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचेही नाव चर्चेत होते. मात्र मोहिते पाटील यांनीच भाजपात बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तिकीट मिळवले. आता पाटील देखील शरद पवार गटात प्रवेश करत आहेत.
माजी आमदार पाटील हे शिवसेनेच्या ‘धन्युष्यबाण’ या चिन्हावर आमदार झाले होते. त्यानंतर करमाळा पंचायत समितीवर त्यांची एकहाती सत्ता होती. मोहिते पाटील यांच्या मदतीने जिल्हा परिषदेवर जिल्हाध्यक्षही त्यांच्या गटाचा झाला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार पाटील यांच्यातच खरी लढत झाली होती. रश्मी बागल या तेव्हा शिवसेनेच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांचे मताधिक्य कमी झाले होते.
राज्यात चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मोहिते- पाटील यांच्यात सामना रंगला आहे. प्रचाराने आता वेग घेतला आहे. शरद पवार यांची करमाळा येथे जाहीर सभा होणार आहे. शरद पवार व करमाळा विधानसभा मतदारसंघ यांचा जुना संबंध आहे. येथील राजकारण शरद पवार यांना चांगलेच माहित आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा येथील सभेमध्ये शरद पवार हे नेमके काय बोलतील याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.